पालघर (वाडा ) -तानसा अभयारण्यातील दहा किलोमीटर अंतरातील जल, वायू, ध्वनी आणि इतर प्रदूषण निर्माण करणारे कारखाने बंद करावेत, अशा नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून वाडा तालुक्यातील कंपन्याना देण्यात आल्या आहेत. नोटीसमुळे येथील कारखानदारात खळबळ माजली आहे. यामुळे येथील रोजगार व इतर उद्योगांना खीळ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयात माती उत्खननावर बंदी येत असल्याने वीटभट्टी व्यवसाय अडचणीत येत आहेत. त्यामुळ जनसामान्यांनकडून संतापाची लाट उसळत आहे.
केंद्रीय पर्यावरण व वन खात्याविरोधात न्यायालयात नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनल न्यू दिल्ली यांनी 105/2018 ने अपील दाखल केले होते. ठाणे आणि पालघर सीमा भागातील तानसा अभयारण्य इको सेंसेटिव्ह प्रभागात मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण केले जात आहे. हे प्रदूषण करणाऱ्यांना प्रतिबंध करावा. अभयारण्याच्या सीमा भागापासून दहा किलोमीटर अंतरापर्यत प्रदुषण निर्माण करणारे उद्योग व कारखाने बंद करावेत. यावर 27 फेब्रुवारी 2019 ला सुनावणी झाली. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून वाडा तालुक्यातील 40 हून अधिक कंपन्यांना कारखाने का बंद करू नयेत, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या रोजगाराबरोबरच कारखानदारीला हादरा बसला आहे.