गावठी दारूसाठी लागणारा काळा गूळ व नवसागराचा अवैध साठा जप्त
गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या नवसागर व काळा गूळाचा अवैधरित्या साठा करून ठेवणाऱ्या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटने कारवाई केली आहे. आरोपींकडून ५३० गोणी काळा गूळ व २८ गोणी नवसागर असा एकूण ६ लाख ५१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालघर - गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या नवसागर व काळा गुळाचा अवैधरित्या साठा करून ठेवणाऱ्या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटने कारवाई केली आहे. आरोपींकडून ५३० गोणी काळा गूळ व २८ गोणी नवसागर असा एकूण ६ लाख ५१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डहाणू पोलीस ठाण्याच्या ऐना गावातील मुकेश ट्रेडिंग या किराणा दुकानात आरोपी राजेश मंहरलाल कोठारी (वय ४५) याने कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ व नवसागर अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत ४ लाख ८० हजार ६०० रुपये किंमतीचा १५ टन (५०० गोणी) काळा गूळ तसेच तामिळनाडू येथून मागवलेला १ लाख ४२ हजार ५०० रुपये किंमतीचा दीड टन (५० गोणी) काळा गूळ तसेच २८ हजार रुपये किंमतीचा २८ गोणी नवसागर असा एकूण ६ लाख ५१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कलम १९४९ चे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.