अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या नालासोपाऱ्यातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा - पालघर बनावट कॉल सेंटर बातमी
नालासोपारा शहरात बनावट कॉल सेंटर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कॉल सेंटरमधून 7 पुरुष आणि 3 महिला अशा एकूण 10 आरोपींना अटक केली आहे.
नालासोपारा (पालघर) - अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा मारला आहे. नालासोपारा शहरात बनावट कॉल सेंटर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कॉल सेंटरमधून 7 पुरुष आणि 3 महिला अशा एकूण 10 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लॅपटॉप, 9 हेडफोन व इतर एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था विभागातील यशवंत गौरवमधील सुंदरम प्लाझा इमारतीच्या सदनिका नंबर 103 मध्ये बॅसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाचे हे बनावट कॉल सेंटर 25 दिवसांपूर्वीच थाटले होते. त्यामध्ये 15 दिवस ट्रेनिंग देऊन 10 दिवसांनी त्याच आरोपींना कामावर रुजू करून घेतले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना बनावट कॉल सेंटरबाबत माहिती मिळाली. यानंतर वरिष्ठांना माहिती देऊन पोलीसांची टीम बनवून छापा घातला. या ठिकाणी प्रकाश दीपक बॅनर्जी (34), जयेश गोपाल पडाया (24), चंदन यशवंत आमीन (24), भरत नारायण भाटी (30), ओमकार नितीन काळे (20), सनीत सुभाष कपाडे (20), कोमल तानाजी बघाडे (19), मुस्कान वाजीद हुसेन (19), प्रांजल पियुष शिंदे (28), चंन्द्रेश मनोहर विश्राम (24) यांना ताब्यात घेतले आहे.