महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढवण बंदर विरोधी रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली; संघर्ष पेटण्याची चिन्हे

वाढवण बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडे, समुद्रातील बीजोत्पादन, खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटींच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येण्याची भीती या सर्व कारणांमुळे स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. यासाठी नागरिकांनी संघर्ष सुरू केला आहे.

Vadhavan Port Agitation
वाढवण बंदर आंदोलन

By

Published : Nov 27, 2020, 6:08 PM IST

पालघर - केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'वाढवण बंदर' उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. वाढवण बंदर विरोधात स्थानिकांमार्फत आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या बाईक रॅलीला परवानगी नाकारत पोलीस कुमक वाढवली. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बाईक रॅली सुरू होण्याअगोदरच पोलिसांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांची धरपकड केली. बंदर उभारणी झाल्यास स्थानिक, मच्छीमार शेतकरी, भूमिपुत्र देशोधडीला लागणार असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले

पदाधिकाऱ्यांची केली धरपकड -

वाढवण बंदारा विरोधात आज वाढवण व आसपासच्या परिसरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी बंदर विरोधी कृती समितीच्या सदस्यांना नोटीस बजावली होती. आज पहाटे साडेपाच वाजताच वाढवण बंदर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव वैभव वझे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, अशोक अंभिरे, हेमंत तामोरे, हरेश्वर पाटील, हेमेंद्र पाटील या सात जणांना ताब्यात घेऊन चिंचणी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले.

संघर्ष चिघळण्याची शक्यता -

आज सकाळी आठ वाजता बाईक रॅलीला प्रारंभ होणार होता. मात्र, त्यापूर्वीच पोलीस गावात दाखल झाले. वाढवण व आसपासच्या परिसरात पोलीस कुमक वाढवण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बाईक रॅलीसाठी जमलेल्या स्थानिकांना मनाई आदेश व कोरोनाचा हवाला देत रॅलीला परवानगी नाकारली. लोकशाहीच्या मार्गाने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रॅली काढली जाणार होती. मात्र, तरीही पोलिसांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाढवण बंदर उभारणीबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे वाढवण बंदर प्रकल्प -

केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयाने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्ताव ठेवला आहे. वाढवण हे आशिया खंडातील सर्वात मोठे व जगातील सर्वोत्कृष्ट १० बंदरांपैकी एक, अशी या बंदाराची रचना आहे. हे बंदर बनवण्यासाठी २२ मीटर खोल समुद्रामध्ये ५ हजार एकरचा भराव टाकावा लागणार आहे.

बंदर उभारणीला स्थानिकांचा विरोध -

वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोरा, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार आहेत. या प्रकल्पासाठी स्थानिकांच्या जमिनीदेखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणच्या दृष्टीने अतिसंवेदनशील विभाग आहे. येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती क्षेत्र, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उद्ध्वस्त होईल. तसेच ५ हजार एकरचा समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांमधून गावांमध्ये घुसण्याची शक्यता आहे. यामुळे गावेच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details