पालघर -वालिव पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराने जप्त केलेल्या 2 कोटी 16 लाख रूपये किमतीच्या विदेशी सिगारेट चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी शरीफ रमझान शेख (वय 48) याच्यावर वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याला अटकदेखील करण्यात आली आहे.
वालिव पोलिसांनी 31 डिसेंबर 2018 ला विदेशी कंपनीचा सिगारेटचा माल तस्करी करणाऱ्यांकडून जप्त केला होता. पोलिसांनी पंचनामा करून 150 गोण्यांमध्ये भरण्यात आलेला हा माल टेम्पोसहित जप्त करत पोलीस ठाण्यात आणला होता. जप्त केलेल्या मालावर निगरानी ठेवणाऱ्या आरोपीने आपल्या सहकाऱ्यांसह त्यातील 100 गोण्या लंपास केल्या. टेम्पोचालकाने आपले वाहन परत मिळविण्यासाठी दावा केला होता. त्यानुसार 11 सप्टेंबरला न्यायालयाने पोलिसांना मालकाला टेम्पो परत देण्याचा आदेश दिला होता. यावेळी, पोलिसांनी जप्त केलेला माल परत मोजला असता फक्त 50 गोण्याच वाहनात दिसून आल्या. सिगारेटचा साठा गायब झाल्याबद्दल चौकशी केली असता सदर पोलीस कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे.