पालघर/वसई - ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाळीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना सूचवून भूलथापा देत त्यांना ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशा घटनांना आळा घालणे, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन अशा भूलथापांना बळी पडण्यापासून त्यांना परावृत्त करणेकरीता वेळोवेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सूचना केल्या होत्या. तसेच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्ह्यांची उकल करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या होत्या.
अनेकांची ऑनलाइन फसवणूक करणारा गुन्हेगार अजय आणि त्याचा साथीदार रफिक वसई पूर्वेकडील रेंज ऑफिस येथील केटली नामक चहाच्या दुकानात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वाळीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मानवी सापळा रचून उत्तर प्रदेश येथील रहिवासी अजय महेशनाथ पंडीत आणि कर्नाटकातील रहिवासी रफिक नन्नुशहापाशा शेख यांना त्यांच्याकडील काळ्या महिंद्रा एक्सयुव्ही कार (एम.एच ४८ ई १२१२) सोबत ताब्यात घेतले.