पालघर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कडवे विरोधक अशी ओळख आहे. मात्र, पालघरमधील वाडा तालुक्यात भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे झळकले भाजपच्या बॅनरवर हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे सरकार फार काळ चालणार नाही'
पालघर जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषद अतंर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 7 जानेवारीला यासाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजप आणि मनसेची युती आहे. त्यामुळे मोदी आणि राज ठाकरेंचे एकत्र एकाच बॅनरवर फोटो झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांचाही फोटोही या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'खाते वाटपावरून अब्दुल सत्तार यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही'
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात भाषणे केली होती. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या वाक्याला लोकांनी चांगलेच उचलून धरले होते. त्यांनी व्हिडिओंच्या माध्यमातून पंतप्रधानांची खोटी वक्तव्यं जनतेसमोर मांडली होती. मात्र, आता मनसेच्या नगरसेवकांच्या मतदानानेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा सभापती भाजपचा निवडून आला आहे. त्यामुळे मनसे ही दुटप्पी भूमिका घेत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.