पालघर -रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी कुडूस येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिजाऊ सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता. मात्र, उपस्थित आंदोलकांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडा-भिवंडी रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन; आंदोलकांवर गुन्हा दाखल
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी कुडूस येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिजाऊ सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता. मात्र, उपस्थित आंदोलकांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडा-भिवंडी या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तर अपघाताने अनेकजण विकलांग झाले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने मोठी वाहने रस्त्यावर अपघाताने आडवी होताना दिसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. या समस्येवर अनेकवेळा आवाज उठवण्यात आलाय. मोर्चे, आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला आहे. मात्र तात्पुरत्या सोयीमुळे परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. यासाठी स्थानिकांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. त्याची परिणीती वाडा-भिवंडी महामार्गावर कुडूस येथे रास्तारोको पुकारण्यात झाली. या आंदोलनाचा पुढाकार जिजाऊ सामाजिक संस्थेने घेतला होता.
अनेकवेळा दुरुस्ती करुनही ती तग धरत नाही. अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात चालते. यंदा हा रस्ता पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे आणि त्यांचे उतार चढावामुळे वाहन चालवणे आव्हानात्मक झाले आहे. तर या रास्ता रोको आंदोलना दरम्यान सरकारी कामात अडथळा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत आंदोलकांवर वाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.