पनवेल - पनवेलमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त आणि उपायुक्त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पनवेलमधील वाहतूक शाखेचे हे प्रयत्न फक्त काही ठिकाणापुरतेच दिसून येत आहे. काही ठराविक ठिकाणी बेकायदेशिरपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई न करता दंडही आकारला जात नाही. त्यामुळे एकप्रकारे वाहतूक विभागाचा महसूल बुडवला जात असल्याचा प्रकार पनवेल शहरात सुरू झाला आहे.
पनवेलमधील नागरिकरणासह वाहनांची संख्याही वाढत असल्याने शहरातील वाहतूक नियमन बिघडत चालले आहे. पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्याकडेला पदपथावर व 'नो पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केली जातात. हा प्रश्न भेडसावत असताना वाहतूक शाखेकडून वाहनांची 'उचलगिरी' सुरूच असते. वाहतूक शाखा आणि ठाणे महापालिकेचे 'टो' करणारे कर्मचारी वाहने उचलून नेतात. ही कारवाई फक्त ठराविक ठिकाणीच होते, तर अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून काही वाहनांवर चांगलीच मेहेरबानी होत असताना दिसत आहे.