पालघर - वसई पश्चिम येथील इंग्रजी माध्यमाच्या 'कार्मेलाईट कॉन्व्हेंट' शाळेकडून विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे. लॉकडाऊनमुळे पालक आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शाळेने कमीत कमी 30 टक्के फी सवलत द्यावी, अशी मागणी घेऊन शेकडो पालकांनी आज शाळा परिसरात आंदोलन केले. मात्र, मुजोर शाळा प्रशासनाने पोलिसांना पाचारण करत पालकांचे वैयक्तिक निवेदनही स्वीकारले नाही.
पैसा नसल्याचा पुरावा द्या; शाळा प्रशासनाची आगळीक -
प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर पालकांकडून विद्यार्थ्यांची फी घ्या, असे सरकारच्या शिक्षण खात्याचे आदेश आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण असताना वसईतील 'कार्मेलाईट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल' या शाळेकडून पालकांना फी मागणी होत आहे. लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाती पैसा नाही. अनेक पालकांचे रोजगार गेले आहे. तसेच काही पालकांची पगार कपातही झाली आहे. अशी परिस्थिती असताना फी कुठून भरायची? असा प्रश्न पालकांसमोर आहे. पालकांनी एकत्र येऊन गेल्या आठवड्यात शाळा प्रशासनाला निवेदन देत 30 टक्के फी सवलत देण्याची मागणी केली. मात्र, शाळेने पालकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट शाळा प्रशासनाने पालकांना आयकर भरल्याचे रिटर्न, बँक पासबूक व रेशन कार्ड सोबत आणण्यास सांगितले. त्यानंतरच पालकांच्या मागणीचा विचार केला जाईल, अशी भूमिका शाळेने घेतली, त्यामुळे पालकांच्या संतापात भर पडली आहे.