पालघर - जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 57, तर 8 पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी हे मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या (बुधवारी) 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्य सरकारच्या स्थापनेनंतर लागलेली ही पालघर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या एकूण 10 लाख 44 हजार 888 इतकी आहे. यात 5,30,621 पुरूष तर 5,14,228 महिला आणि 39 इतर यांचा समावेश आहे. यावेळी मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी मिळून एकूण 7221 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी एकूण 2284 बॅलेट युनिट तर 1853 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तर शिवसेनेचे कडून कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनी येथे हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि काही जागांवर मनसे हे एकमेकांविरोधात लढत आहेत.