पालघर (वाडा) - शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांत नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील डाहे येथे आयोजीत करण्यात आलेल्या सभेत शिवसैनिकांनी आपला रोष प्रकट केला.
वाडा तालुक्यातील डाहे आणि मोज या जिल्हा परिषदेचा भाग हा शहापूर विधानसभा मतदारसंघात येतो. या भागात सेनेचे प्राबल्य आहे. या भागातून शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रत्येकी दोन सदस्य आहेत. आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होऊ लागला होता. आगामी विधानसभेत बरोरांना टिकीट मिळण्याच्या चर्चेनंतर मात्र हा विरोध अधिकच तिव्र होताना दिसत आहे.
माजी आमदार पांडुरंग बरोरा विरोधात स्थानिक शिवसैनिकांचा 'यल्गार' "आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचेच काम करणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला आमदारकीचे तिकीट द्यावे. नाहीतर काम केले जाणार नाही. तसेच पांडूरंग बरोरांना शिवसेनेत घेताना स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घ्यायला हवी होती. हा निर्णय लादण्यात आला असुन निष्ठावंताच्या निष्ठेची आज चेष्टा झालीय. विधानसभा निवडणूक लढावायला शिवसैनिक सक्षम नाही का ? असा सवाल करत, माजी आमदार पांडूरंग बरोरा यांच्या विरोधातील सुर वरिष्ठापर्यंत कळवा व त्यांनी याबाबत लक्ष घालावे." अशी विनंती कार्यकर्त्यांनी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे शहापूर पाठोपाठ आता वाडा भागातही बरोरांना विरोध होताना दिसत आहे.
या सभेला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील, माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, धनंजय पष्टे तसेच उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, युवासेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आम्ही आपल्या भावना वरीष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी नाराज शिवसैनिकांना दिले.