पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली असून पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी हा कार्यभार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या निर्णयाबाबतची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच हत्या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करून नेमकी घटना कशी घडली? हे जाणून घेतले. त्या घटनेच्या दिवशी व यापूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.