पालघर - कोरोना साथरोग आणि लॉकडाऊनमुळे बाजारात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. मात्र, असे असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या वाहनविक्रीच्या तुलनेत यंदा जास्त विक्री झाल्याची माहिती विरार परिवहन विभागाने दिली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाला मिळाला कोट्यवधींचा महसूल -
घटस्थापनेपासून नवमीपर्यंत (१७ ते २४ ऑक्टोबर) 813 वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झाली. गेल्या वर्षी ही संख्या 435 होती. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी दुचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली असून विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 587 दुचाकी खरेदीची नोंदणी झाली आहे. याव्यतिरिक्त 182 मोटारकार, 31 मालवाहतूक ट्रक, 5 रिक्षा या वाहनांचीही खरेदी झाली आहे. त्यामुळे या वर्षी कार्यालयाच्या तिजोरीत 4 कोटी 96 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी 2 कोटी 94 लाख रुपये महसूल जमा झाला होता.
वाहन विक्रीचे सीमोल्लंघन -
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळीतील पाडवा या साडेतीन मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. यंदाच्या वर्षात गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेला कोरोना लॉकडाऊनमुळे वाहनविक्रीला फटका बसला होता. 'अनलॉक'नंतर गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्री धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नेहमीसारखीच वाहन विक्री होणार का? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच वाहन विक्री वाढल्याने परिवहन कार्यालयात विक्रमी वाहन नोंदणी झाली. कोरोना महामारीमुळे प्रवासी वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याने व आपला प्रवास सुरक्षित व्हावा, या कारणांमुळे दुचाकी खरेदीत या वर्षी वाढ झाली. तर, मंदीचे सावट असल्याने महागड्या गाडया खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केल्याने यावर्षी टॅक्टरची खरेदी झाली नाही. मात्र, मंदीच्या काळातही 4 कोटींच्यावर महसूल मिळाल्याने परिवहन विभागाची चांदी झाली.
कोरोना महामारीमुळे या वर्षी मंदीची लाट असतानाही वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली. चार महिने परिवहन कार्यालय बंद असल्याने व शुभ मुहूर्तावर नागरिकांनी वाहनांची खरेदी केल्याने या वर्षी महसुलात वाढ झाली, असे विरारचे परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी सांगितले.