महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळिमा: क्षयरोगानं ग्रस्त मुलीवर नराधम बापाचा अत्याचार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू - मुलीचा मृत्यू

Palghar Rape Case : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथं एका नराधम बापानं क्षयरोगानं ग्रस्त मुलीवर अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. अत्याचारानंतर मुलीची प्रकृती खालावल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

Palghar Rape Case
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 7:47 AM IST

Updated : Nov 18, 2023, 9:44 AM IST

पालघर Palghar Rape Case : क्षयरोगानं ग्रस्त असलेल्या मुलीवर नराधम बापानच बंधक ठेऊन अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. अत्याचारानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी बापाविरोधात भादंवी कलम 376 ( एन ) 354 ( ए ) 342, 322, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ महिन्यांपासून ती क्षयरोगानं आजारी :पीडित तरुणी ही २२ वर्षांची असून ती नालासोपारा इथं रहात होती. मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगानं आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली आहे. पीडित मुलीचे ५४ वर्षीय वडीलच तिच्यावर बलात्कार करुन शारिरीक छळ करत असल्याची तक्रार तिच्या आईनं नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर आईनं दिली तक्रार :पीडित मुलीवर सतत तिचा बापचं बलात्कार करत होता. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. मुलीला तो बळजबरीनं घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प रहात होते. हे प्रकार सातत्यानं वाढत होते. आरोपी पिता मुलीला मारहाण करत होता. दरम्यानच्या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्यानं बळजबरीनं गर्भपातही केला होता, अशी माहिती तिच्या आईनं पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पीडित तरुणीला क्षयरोगाची लागण झाल्यानंतरही पित्याचे अत्याचार सुरू होते. मुलीच्या मृत्यूनंतर आईनं पोलिसात
तक्रार करण्याचं धाडस दाखवलं. तिच्या आईच्या तक्रारीवरुन नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापा विरोधात कलम ३७६ (एन), ३५४ (अ) ३४२, ३२२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पित्याच्या मारहाण आणि शारिरीक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईनं केला आहे.


नालासोपारा पोलीस करत आहेत तपास :प्रथमदर्शनी पीडित मुलीचा मृत्यू हा क्षयरोगानं झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. मात्र तिच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरुन तिच्यावर बलात्कार करणं, विनयभंग करणं, गर्भपात करणं, डांबून ठेवणं आदी तक्रारीनुसार पीडित मुलीच्या पित्यावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल केला आहे. आरोपी बापाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे. दरम्यान यामध्ये मुलीचा मृत्यू नेमका कशानं झाला, तिच्यावर अत्याचार झाले होते का? याचा तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

Last Updated : Nov 18, 2023, 9:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details