पालघर Palghar Rape Case : पालघर जिल्ह्यांत एका ३५ वर्षीय महिलेच्या घरातील वास्तूदोष आणि काळ्या जादूद्वारे इतर वाईट जादू दूर करण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विशेष म्हणजे बलात्कार करणारे पाचही जण पीडित महिलेच्या पतीचे मित्र असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी तलासरी पोलीसांनी यातील पाचही आरोपींना अटक केलीय. या घटनेमुळं पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.
विधी करण्याच्या बहाण्याने बलात्कार :याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित महिलेला तिच्या घरावर तसंच पतीवर कुणीतरी काळी जादू केल्याचं आरोपींनी सांगितलं होतं. या काळ्या जादूमुळेच तिच्या घरावर अनेक संकट येत होती. यातून शांतता परत मिळवण्यासाठी तिला काही विधी कराव्या लागतील असे आरोपींनी महिलेला सांगितलं होतं. यानंतर हे उपाय करण्यासाठी आरोपींनी 2018 च्या एप्रिल महिन्यापासून महिलेच्या घरी जायला सुरुवात केली होती. घरात महिला एकटी असताना आरोपी विधी करायचा बहाणा करुन तिच्या घरात यायचे. यानंतर आरोपी महिलेला पंचामृतच्या नावाखाली गुंगीचं औषध पाजायचे. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार करायचे. हा घटनाक्रम वारंवार सुरू होता. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. पीडितेच्या घरात शांतता राहिल आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळेल असं आमिष दाखवून तिच्याकडून पैसे आणि सोनं उकळल्याचंही समोर आलंय. यानंतर आरोपींनी महिलेवर 2019 साली ठाण्यातील येऊर जंगलात, कांदीवलीच्या मठात, लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर अशा विविध ठिकाणी बलात्कार केला.