पालघर - जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथे समोर आला आहे. हा तांदूळ प्लास्टिक सदृश्य असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शालेय पोषण आहारातील वाटप तांदूळ प्लास्टिक सदृश्य आढळला -
कोरोनामुळे सध्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप करण्यात येत असून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील तांदळात मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याचे समोर आले आहे. पालघरमधील मोखाडा तालुक्यातील खोडाळा-वाकडपाडा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेला तांदूळ हा पालकांनी पुन्हा शाळेत परत केला आहे. तांदूळ निवडताना आणि गिरणीत टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा भेसळयुक्त तांदूळ पाण्यात टाकल्यास काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतो.
पालघरमध्ये शालेय पोषण आहारामध्ये प्लास्टिकचा तांदूळ संबंधितांवर कारवाईची मागणी - विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेला तांदूळ हा प्लास्टिकचा दृश्य व भेसळयुक्त असल्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भेसळयुक्त पोषण आहार बदलून मिळावा. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे धान्य पुन्हा येणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारे शारीरिक इजा होऊ नये म्हणून हे धान्य वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी देखील वाकडपाडा येथील शालेय व्यवस्थापन समिती व पालकांकडून करण्यात आली आहे.
तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी -
दरम्यान विद्यार्थ्यांना वाटप या प्लास्टिक सदृश्य या तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.