महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात बहुजन विकास आघाडीचे गडकिल्ले फुटले

शहरी भागातील पालघर, बोईसर, नालासोपारा या विधानसभा मतदारसंघात लाखाहून अधिक मताधिक्य घेतल्याने राजेंद्र गावितांची या निवडणुकीत विजयी नय्या पार झाली.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 25, 2019, 6:13 AM IST

Updated : May 25, 2019, 10:54 AM IST

वाडा (पालघर)- पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना व इतर घटक पक्षाच्या महायुतीने बहुजन विकास आघाडीचे बालेकिल्ले उध्वस्त केले. शहरी भागातील पालघर, बोईसर, नालासोपारा या विधानसभा मतदारसंघात लाखाहून अधिक मताधिक्य घेतल्याने राजेंद्र गावितांची या निवडणुकीत विजयी नय्या पार झाली. मात्र, ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघात युतीला रोखण्यात बविआला यश आले.

पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीने शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उतरवले होते. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार बळीराम जाधव यांच्याशी राजेंद्र गावितांची प्रमुख लढत पहावयास मिळाली.

राजेंद्र गावित हे पुर्वी काँग्रेस आमदार म्हणून पालघर विधानसभा मतदारसंघात निवडून आले. पुढे आघाडीच्या सरकारमध्ये आदिवासी विकास खात्याचे काम पाहीले. तत्पुर्वी विकासाच्या दृष्टीने आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाची मागणी भाजपकडून होत असायची. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व खासदार चिंतामण वनगा यांच्या समवेत जव्हार येथे भाजपने अनेकदा आंदोलने केली.

जिल्हा विभाजनाची मागणी पुढे येत असताना आघाडी सरकार पायउतार होत असताना राजेंद्र गावित यांनी पुढाकार घेऊन ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मीती केली. राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये असताना लोकसभा निवडणूक लढविण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत विरोध, धुसफूसीने त्या मार्गात अडथळा आल्याचे सांगितले जात होते.

भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले आणि पोटनिवडणुकीत राजेंद्र गावितांनी कमळ हाती घेतले. तर इकडे शिवसेनेने चिंतामण वनगा पुञ श्रीनिवास वनगा यांना शिवबंधन बांधून पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. मात्र, या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार करीत भाजपने ही जागा पटकावली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या याच पालघर लोकसभा जागेच्या हट्टापायी भाजपशी शिवसेना रुसली. जागा मिळाली पण उमेदवाराचा घोळ सुरूच राहीला आणि सेना भाजपच्या संगनमताने राजेंद्र गावितांना शिवसेनेने या लोकसभा निवडणुकीत उतरविले.

पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या प्रचाराकरीता नालासोपारा - वसई या मतदारसंघात बविआचे प्राबल्य असणारे गड भेदण्यासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी अदित्यनाथांना उतरविण्यात आले. त्यामुळे तेथील उत्तर भारतीय व इतर समाजाचे वोट बँक मिळाली तीच रणनिती या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांना प्रचारात उतरवून बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील बालेकिल्ल्यात राजेंद्र गावितांना १ लाख ३३ हजार २५९ मते मिळाली तर बविआचे बळीराम जाधव यांना १ लाख ७ हजार ७२४ मते मिळाली. तर बविआच्या बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या गडात गावितांना १ लाख ४ हजार ३९२ मते तर बळीराम जाधव यांना ७६ हजार २२० मते मिळाली.

हा परीसरात एमआयडीसीत असुन उत्तरभारतीय इतर समाज संख्या जास्त आहे. या दोन्ही मतदारसंघात ३ हजारांहून अधिक नोटा मतदानाला पसंती मिळाली. वसई विधानसभा मतदारसंघात बविआचे बळीराम जाधव हे गावितांच्या ११ हजार ३०९ मताने पुढे राहीले. तेथे वसई - विरार महानगरपालिकेत बविआही सत्तास्थानी आहे. पालघर विधानसभा मतदारसंघ पुर्वीपासुन गावित हे होमग्राऊंडच्या ठिकाणी पकड व त्यातही शिवसेनेचे वर्चस्व असल्याने गावित यांनी १ लाख ११ हजार ७९४ मते घेतली आणि बविआने ५१ हजार ६९३ मते घेतली.

ग्रामीण भागात मात्र महायुती ढेपाळल्याचे चित्र दिसतेय. विक्रमगड, जव्हार, तलासरी आणि डहाणू भागात कम्युनिस्ट पक्षाचे थोडेफार वर्चस्व आहे. त्यातच बविआच्या दिमतीला महाआघाडीचे राष्ट्रवादी, काँग्रेस होतीच. कम्युनिस्ट मते ठाम असल्याचे सांगितले जाते. या निवडणुकीत कम्युनिस्ट लाखभर मताचे योगदान देईल असे वक्तव्य बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत कम्युनिस्ट पक्षाशी आघाडी करताना केले होते.

डहाणू विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावितांना ७२ हजार १३९ तर बविआने ८० हजार २८६ मते मिळवली. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित ७३ हजार ७०४ मते तर बळीराम जाधवांनी ७९ हजार ४५८ मते घेतली. या दोन्ही मतदारसंघात ७ हजारांहून अधिक नोटा मत नोंदवून उमेदवार नापसंतीचा सुर आळविला गेला. महायुतीच्या राजेंद्र गावितांनी बविआचे शहरीभागातील गडकिल्ले फोडण्यात त्यांना यश आले पण ग्रामीण भागात त्यांना या निवडणुकीत रोखून धरण्यात आले.

Last Updated : May 25, 2019, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details