पालघरमध्ये वाढीव मतदानाचा कोणाला होणार फायदा? - राजेंद्र गावित
पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.७२ टक्के मतदान झाले. २०१८ च्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत मतदान १०.५ टक्क्यांनी वाढले. वाढलेले मतदान कोणाला? यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
पालघर - लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात होती.
मे २०१८ साली झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदान १०.५ टक्क्यांनी वाढले आहे. सुमारे ३ लाख १४ हजारांहून अधिक मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा वाढलेला टक्का शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या व उमेदवांरांच्या चिंतेचे कारण बनले आहे. वाढलेले मतदानच विजेता ठरविणार असल्याचे बोलले जात आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.७२ टक्के मतदान झाले असून डहाणू ६७.१३ टक्के, विक्रमगड ६९.५० टक्के, पालघर ६८.५७ टक्के, बोईसर ६८.४९ टक्के, नालासोपारा ५२.१६ टक्के, तर वसईत ६५.२४ टक्के मतदान झाले आहे. यंदा १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झाले होते. २०१८ च्या तुलनेत यावेळी १०.०५ टक्के वाढीव मतदान झाले आहे. २०१४ नंतर या मतदारसंघात जवळपास तीन लाख नऊ हजार नवीन मतदार नोंदणी झाली. यापैकी बहुसंख्य मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू आणि विक्रमगड या दोन मतदारसंघात जोमाने काम केल्याने या दोन मतदारसंघात टक्केवारी वाढल्याचे बोलले जात आहे. एकीकडे विक्रमगड विधानसभा क्षेत्रात मतदान साडेसात टक्क्यांनी वाढले आहे. पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबयांविषयी सहानुभूती असताना ५९ टक्के मतदान झाले होते. तर यंदा ते वाढून ६९ टक्क्यांपर्यंत गेल्याने त्या विधानसभा क्षेत्रातील समीकरणे बदलल्याचे चित्र आहे.
एकीकडे वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा मतदारसंघात झालेल्या वाढीव मतांवर बहुजन विकास आघाडीचे नेते दावा करत आहेत, तर हा वाढीव टक्का आमचाच असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला भाजपची किती मदत झाली, त्याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी ग्रामीण भागात असलेल्या आपल्या प्रभावाबद्दल मतदानापूर्वी वेगवेगळे दावे केले होते. हे दावे-प्रतिदावे प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात झालेले वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात पडते, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.