पालघर MP Shrikant Shinde:आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना पक्षाची पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालघर, बोईसर आणि डहाणू विधान सभानिहाय मेळावे घेतले. (Uddhav Thackeray) या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकांत शिंदे आले होते. यावेळी समन्वयक आणि मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर लोकसभा निरीक्षक पांडुरंग पाटील उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात जनतेला घरात कोंडून ठेवलं. मेट्रोसह अन्य कामे रेंगाळली. कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. या खरेदीतील प्रत्येक गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होईल.
'ते' वृत्त साफ खोटं:पालघर मतदारसंघ भाजपाला सोडण्यात येणार असल्याचं वृत्त फेटाळून खासदार शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एखाद्या जिल्ह्यातील दौरा रद्द होण्याचा विपरीत अर्थ कोणीही काढू नये. मुख्यमंत्री असल्यानं त्यांना अनेक कामं असतात. अचानक काही तातडीची कामं निघू शकतात. त्यामुळे दौरा रद्द करावा लागतो. पुन्हा दौरा जाहीर होऊ शकतो. मुख्यमंत्री आले नाहीत, म्हणून हा मतदारसंघ भाजपाला गेला असा अर्थ काढू नका. वाढवण बंदराबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, या बंदराबाबत अनेक मतंमतांतरं आहेत. तज्ज्ञांसोबत चर्चा केली जाईल. शंकाचं निरसन करून जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.