पालघर- मत्स्यव्यवसाय विभाग पालघरने सुखसाळ येथे अनधिकृत पद्धतीने सुरू केलेला मांगूर मत्स्यबीज केंद्रावर कारवाई केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या या कारवाईत 100 किलो मांगूर मासे, प्रजनक 12 लाख मांगूर माशाची अंडी नष्ट केली असून हे मत्स्यबीज केंद्र बंद केले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना विक्रमगड येथे मुंबई येथील काही व्यावसायिक अनधिकृतपणे प्रतिबंधित असलेल्या मांगूर माशाचे प्रजनन केंद्र चालवत असल्याची व मांगूर माशाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मत्स्यव्यवसाय विभाग व पोलिसांनी शिंपीपाडा येथे छापा टाकला. या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाला प्रतिबंधित मांगूर माशाचे प्रजनन केंद्र व मांगूर माशाचा साठा आढळून आला.
100 किलो मांगूर मासे व 10 ते 12 लाख अंडी केली नष्ट -
या पथकाने मांगूर माशाच्या बीज केंद्रातील 100 किलो मांगूर मासे, प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मांगूर माशांची प्रजनन केलेली अंडी नष्ट केली आहेत. मांगूर माशाचे प्रजनन केंद्र बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी कुलदीप पाटील, आजिम खान, सईद अख्तर या तीन आरोपींविरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांगूर मासा संवर्धन प्रतिबंधित -
मांगूर माशाचे मत्स्यसंवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने काही मंडळी त्याच्या उत्पादनाकडे वळतात. या माशांच्या उत्पादनाच्या वेळी खाण्यास योग्य नसलेल्या कोंबडीचे मांस तसेच कत्तलखान्यातील कुजलेली शेळी, मेंढी व इतर गुरांचे खाद्य म्हणून देण्यात येते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे आढळून आले. मांगूर मासा मांसभक्षक असल्यामुळे इतर माशांच्या मत्स्य पालन करण्यास अडचणी निर्माण करतात. संवर्धन करण्यात येणाऱ्या इतर माशांचे भक्षण करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तलावात, जलाशयातील पारंपारिक मासे यांच्या संख्येवर देखील परिणाम होतो. भारतीय प्रजातींना माशापासून धोका निर्माण होत, असल्याने मांगूर प्रजातीच्या माशांचे संवर्धन, प्रजनन विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे.