पालघर- भात पिकांना संरक्षित करण्यासाठी शेतकरी वर्ग पीकविमा उतरवित असतो. हा पीकविमा शेतकरी वर्ग स्वेच्छेने काढत असतो. मात्र, काढलेला पीकविमा संकटकाळी फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचा खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचा विमा उतरविला जातो. यात खरीप हंगामातील भात पिकांचा विमा सेवा सहकारी संस्था बँकेच्या माध्यमातून खाजगी पिकविमा कंपन्यांकडून उतरविला जातो. सक्तीचा पीकविमा नसल्याने काही शेतकरीवर्गाकडून पीकविमा उतरविला जात नाही. मात्र, जे शेतकरी दरवर्षी पीकविमा उतरविताता त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा कंपन्यांकडून विमा मिळत नाही. विमा देण्यात कंपन्यांकडून दिरंगाई केली जाते, अशी तक्रार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.