पालघर - ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यांनी यावेळी तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी केली. तसेच त्यांनी वीजवितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची देखील पाहाणी केली. त्यानंतर राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची उपस्थिती होती.
गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव व तौक्ते चक्रीवादळाची पूर्वकल्पना यातून या संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची तयारी करून ठेवली होती. त्यामुळेच वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊनही बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा लवकर सुरू करता आला. वादळामुळे वारंवार वीजपुरवठा बाधित होणाऱ्या भागात विजवाहिन्या येत्या काळात भूमिगत करण्याची शक्यताही आम्ही पडताळून पाहत आहोत. अशा संकटाचा यशस्वी सामना करण्यासाठी टास्क फोर्स आणि कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.