पालघर -डहाणू तालुक्यातील तवा आदिवासी आश्रमशाळेने इतर आदिवासी आश्रमशाळेत ( Ashram School ) 10 वी पास झालेल्या व 65 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क घेतलेल्या असंख्य ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना ( students ) अपुऱ्या वर्गखोल्याचे कारण देऊन 11 वी प्रवेश नाकारला आहे. या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यात व पालकांत तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे सध्या चित्र दिसत आहे. एकीकडे राज्य शासन ( State Govt ) व शिक्षण विभाग आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळेतील गळती प्रमाण कमी व्हावे, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शालेय स्तरावर राज्य शासन आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची इच्छा असताना तवा आदिवासी आश्रमशाळेतील शाळा प्रशासन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
अपुऱ्या वर्ग खोल्याचे कारण -आदिवासी विद्यार्थ्यांना अपूर्ण वर्ग खोल्याचे, इतर शाळेतील विद्यार्थी, असे अनेक कारणे देऊन त्यांना 11 वी प्रवेश नाकारत आहे. सध्या ग्रामीण भागातून असंख्य 10 वी पास झालेले विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी तवा आश्रम शाळेत येत आहेत. परंतु, शाळा प्रशासन केवळ अपुऱ्या वर्ग खोल्याचे कारण देऊन पुढील शिक्षणापासून वंचित ठेवताना दिसत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष वंझे हे ग्रामीण भागातील 10 वी पास झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकास भेटण्यास गेले असता व 11 वी परीक्षा बाबत विचारणा केली असता सदरील मुख्याध्यापकांनी आमच्याकडे वर्गखोल्या अपुऱ्या आहेत. हे तवा आश्रम शाळेतील विद्यार्थी नाहीत, इतर शाळेत 10 वी पास झालेले विद्यार्थी आहेत, असे उत्तर देण्यात आले आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते हे डहाणू प्रकल्प अधिकारी आसीमा मित्तल यांची भेट घेऊन तवा आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत झालेला प्रकार त्यांना सांगणार आहेत.