पालघर - श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर बोटीद्वारे लक्षद्वीपमार्गे भारतीय समुद्रहद्दीत शिरले असल्याची माहिती गुप्तहेर खात्याने दिली आहे. त्यानंतर कोकण किनाऱ्यासह पालघर जिल्ह्यातील सागरी सुरक्षा यंत्रणेला सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा कठोर करण्याबाबत अलीकडेच कोकण पातळीवर बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.
वाढत्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस सतर्क पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सागरी सुरक्षा दल कायमच सज्ज असते, असे स्पष्ट केले. असा हल्ला कोणत्याही वेळी होवू शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही जिल्ह्यातील सागरी सुरक्षा यंत्रणांना अधिक सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सागरी सुरक्षेशी संबंधित समुद्र किनाऱ्यावरील गावातील स्थानिक सागरी सुरक्षा समित्यांनाही सजग राहण्यास सांगितले असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
अलीकडेच झालेल्या श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यात ३५० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. या हल्लेखोरांचा श्रीलंकेमार्फत शोध सुरू आहे. तसेच हे हल्लेखोर श्रीलंकेतून समुद्रमार्गे भारतात शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन तटरक्षक दलानेही आपली सुरक्षा अधिक घट्ट केली आहे.
या पार्श्वभूमीवर अलीकडेच इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादविरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सागरी किनाऱ्याच्या असलेल्या ग्रामपंचायतींना व जीव रक्षक दलालांना बैठकीच्या समन्वयाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसे जागरूक राहता येईल, याकडे विशेष लक्ष देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
समुद्रकिनाऱ्यालगत किंवा समुद्रात संशयित नौका किंवा जहाजे आढळली तर, नौका आणि जहाजधारकांची तपासणी करून त्यांच्या परवान्यांची तपासणी केली जात आहे. संबंधित नौका किंवा जहाज मालकाकडे आवश्यक ती कागदपत्रे किंवा परवाना नसल्यास त्यांच्याविरोधी कारवाई पोलीसांमार्फत करण्यात येणार आहे. समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा आढळल्यास मुंबई कोस्टगार्ड कक्षाला किंवा पालघर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन जिल्हा पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
केरळच्या समुद्री हद्दीत सागरी सुरक्षा अधिक चोख करण्यात आली असून सुरक्षागस्त वाढविण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे मुंबई कोस्टगार्डचे चीफ कमांडन्ट विनिष कृष्णन यांनी सांगितले आहे.