पालघर- बोईसर येथे अॅसिड हल्ला करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी गुड्डू यादव याला पालघर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी सुनावली आहे.
बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी गुड्डू यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुड्डू यादव याला ताब्यात घेतले. सरकारी वकील दीपक तरे यांनी तसेच पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे या आधारावर गुड्डू यादव याच्यावरील आरोप पालघर न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणी झालेल्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी आरोपी गुड्डू यादव या गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. दोघांचा स्वतंत्र खून केल्याप्रकरणी आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपी गुड्डू यादव याला एकत्रित भोगायच्या आहेत.
मोबाईल चोरीच्या क्षुल्लक कारणातून केला खून-
बोईसर औद्योगिक क्षेत्रातील पॅरेडाइज् कंपनीमध्ये आरोपी गुड्डू यादव, राजकुमार रविदास व त्यांची पत्नी गीतादेवी हे तिघे काम करीत होते. यापैकी राजकुमार व त्यांची पत्नी आपल्या मुलांसह या कंपनीतच राहत होते. आरोपी गुड्डू याने नोव्हेंबर २०१५ मध्ये राजकुमार यांचा मोबाईल चोरला होता. याविषयी राजकुमार यांनी गुड्डू याला विचारणा केली. मात्र, त्यानंतर या दोघांमध्येही या प्रकरणावरून वादावादी झाली. या वादावादीनंतर राजकुमार यांनी ही घटना आपल्या मालकाला सांगितली. त्यावेळी मालकाने गुड्डू यादव याला बोलावून खडसावले. याचा मनात राग ठेवून आरोपीने राजकुमार यांचा वचपा काढण्याचे ठरवले.
खटल्याची माहिती देताना सरकारी वकील झोपलेल्या पती-पत्नीच्या अंगावर टाकले होते अॅसिड-
गुड्डू याने कंपनीतील ज्वलनशील द्रव्य सल्फुर सल्फुरिक अॅसिडची बादली घेऊन कंपनीत झोपलेल्या राजकुमार व त्यांच्या पत्नीच्या अंगावर फेकले. ही घटना ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. त्यामुळे राजकुमार व त्यांच्या पत्नीला गंभीर इजा झाली. राजकुमार यांनी गुड्डूला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी तिथून फरार झाला. कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांनी दोघांनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, दोघेही ९८ टक्के भाजल्याने राजकुमार व त्यांची पत्नी गीता या दोघांचाही मृत्यू झाला.