पालघर- पावसाळ्याच्या काळात आलेली फयानसारखी वादळे आणि आता कोरोनामुळे मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकूणच वर्षभरातील मच्छीमारी धंदा तोट्यात गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू या सागरी किनारा भागात मच्छिमार समाज मोठ्या संख्येने आहे. मच्छिमार वादळाचा सामना करून सप्टेंबर ते डिसेंबर आणि मार्च ते एप्रिल- मे या महिन्यात मच्छिमारी मोठ्या प्रमाणात करतो. आपला खर्च वगळता सुगीचे दिवस या कालावधीत निघत असतात. मात्र, कोरोनाच्या या नव्या संकटाने मच्छिमार समाजाचा वर्षभराचा धंदा बुडला आहे. मागील सप्टेंबर ते डिसेंबर काळात फयान व महाचक्रीवादळाने मच्छीमार वर्ग मासेमारी करू शकला नाही.
भारतीय हवामान खात्याच्या निर्देशानुसार मच्छिमाऱ्यांनी आपल्या बोट समुद्रात घातल्या नाहीत आणि खोलवर गेलेल्या बोटीही परत माघारी फिरल्या. त्यामुळे बंदर किनारी हजारोंच्या संख्येने बोटी किनारी लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्यांच्या मासेमारीला नैसर्गिक आपत्तीने खंड आणला होता. तर उन्हाळ्यात कोरानाच्या प्रादुर्भावाने खंड पडला आहे. पावसाळ्यातील मत्सशेतीचा तुटवडा हा या उन्हाळ्यात भरून निघेल असे मच्छिमारांना वाटत होते. सागरी किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांना मत्सशेती केल्याशिवाय पर्याय नाही. यात खाडी किनारी त्यांचे मोठे कोळंबी प्रकल्प सुरू असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आणि संचारबंदीचा फटका इतर शेतीमालाला बसतोय त्याच पद्धतीने मच्छिमारीही अडचणीत आली आहे. वादळ काळात सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नाही, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने मच्छिमारांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.