पालघर- सरकारी कार्यालय म्हटले की समोर येते कागदपत्रे फाईलचे गठ्ठे, अस्वच्छता अडीअडचणीत बसलेले कर्मचारी. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती मर्यादित केल्याने अनेक सरकारी कार्यालयांची काहीशी दुरवस्था झाल्याचेही चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेले पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी स्वतः पुढाकार घेत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे खुद्द जिल्हाधिकार्यांनी पुढाकार घेत राबवलेल्या या स्वछता मोहीमेमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
नुतन जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात राबवली स्वच्छता मोहीम
कोणत्याही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किवा शासकीय कार्यालये म्हणजे अस्वच्छतेचे आगार असे नागरिकांचे मत असते. तसेच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचीही अवस्था. परंतु हे चित्र बदलण्यासाठी नवीन रुजु झालेल्या जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पदभार स्वीकारताच स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अनावश्यक कागदपत्रे, वस्तू, अनावश्यक फर्निचर यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी होणारी अडचण तसेच अस्वछता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी स्वतः पुढाकार घेत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवली. जिल्हा कार्यालयाची साफसफाई करून आवश्यक कागदपत्रे आणि उपयोगात नसलेल्या वस्तू इतरत्र हलवण्यात आल्या. अनावश्यक वस्तू व कागदपत्रे बाजूला झाल्याने कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळीक जागा मिळेल. तसेच स्वच्छ व नेटक्या कार्यालयामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढून, त्यांच्या कामामध्ये निश्चितच सुधारणा होईल, असे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी या स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने सांगितले.