पालघर(वाडा)- शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला, त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचे पडसाद वाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले. वाडा तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे पक्षातून गळती न झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला. मात्र, वाड्यातील युवा कार्यकर्ते व पांडूरंग बरोरा यांच्या जवळचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले आहेत.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधले. पांडूरंग बरोरा हे सेनेच्या किंवा भाजपच्या वाटेवर असल्याचे तर्क वितर्क प्रसारमाध्यमांमध्ये उमटत होते. मात्र, बरोरांची शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेशी जवळीक आणि ठाणे जिल्हा परिषद मधील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग हे त्यांचा कल शिवसेनेकडे असल्याचा ठळकपणे निर्देश करत होते.