महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2019, 9:16 AM IST

Updated : Sep 19, 2019, 12:32 PM IST

ETV Bharat / state

पालघर विधानसभा आढावा - आघाडीचे सेनेसमोर आव्हान; सेना गड राखणार का?

पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असून वनगा कुटुंबियांना दिलेला शब्द शिवसेनेकडून पाळला जातो की नाही? उमेदवारी कोणाला मिळते ? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सेनेसमोर आव्हान उभे करू शकते की नाही? शिवसेना आपला गड कशाप्रकारे राखते.....हे पाहणे या निवडणुकीत औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालघर विधानसभा

पालघर - पालघर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना 1 लाख 11 हजार 794 मते मिळाली व या मतदारसंघातून 60 हजारांहून अधिकचे मताधिक्य त्यांना होते. त्यामुळे शिवसेनेचे या पालघर विधानसभेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडी समोर सेनेला मात देण्याचे भलेमोठे आव्हान उभे आहे.

प्रतिनिधी नमित पाटील यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - आढावा तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा - कोण मारणार 'बाजी'?

2014 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले कृष्णा घोडा यांनी गावित यांचा अवघ्या 515 मतांनी पराभव केला. त्यानंतर शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनानंतर, झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांना उमेदवारी दिली.

हेही वाचा - परळीत होणार तिरंगी लढत, मुंडे बहिण-भावाला देशमुख देणार आव्हान

या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी 68 हजार 129 मते मिळवून, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित यांचा 18 हजार 948 मतांनी पराभव केला. गावित यांना 48 हजार 181 मते तर, बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर 36 हजार 781 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

हेही वाचा - वेध विधानसभा निवडणुकांचे; दापोली विधानसभा मतदारसंघ : कुणाचे 'कदम' पडणार पुढे ?

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांना मिळालेल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात ते जनतेवर आपली छाप पाडण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्याबद्दल पालघर मतदारसंघातील मतदार उघडउघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल की नाही? याबाबत शंका आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वनगा कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले. मात्र, तरीही श्रीनिवास वणगा यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. आता होणाऱ्या पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा इच्छूक असून त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उमेदवारी श्रीनिवासला देऊन दिलेला शब्द पूर्ण करतील का?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालघर परिसरात नव्याने दाखल झालेले व सेना नेत्यांची जवळीक असलेले डॉ. विश्वास वळवी देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पालघर परिसरात झालेल्या अनेक कार्यक्रमांच्या व उत्सवांच्या बॅनरवर ते सेना पदाधिकाऱ्यांच्यासोबत झळकल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतही वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेतर्फे पत्रकार दिनेश तारवी देखील इच्छुक आहेत. मात्र, मातोश्रीवरून कोणाच्या उमेदवारीचा आदेश येतो हे देखील गुलदस्त्यातच आहे.

दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आघाडीची घोषणा झाली असली, तरीही बहुजन विकास आघाडी त्यांच्यासोबत जाणार की नाही? तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आताही महाआघाडी होणार की नाही? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी अवस्था खिळखिळी झाली असून कोण उमेदवार? याबाबत संभ्रम कायम आहे. काँग्रेसकडून पालघरचे माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, मनोज दांडेकर, माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा, योगेश नम यांच्यासह अनेक नावे पुढे येत आहेत.

तसेच नुकत्याच बहुजन विकास आघाडीच्या पार पडलेल्या एका सभेत पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागा लढवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीकडून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचे देखील नाव समोर येत आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असून वनगा कुटुंबीयांना दिलेला शब्द शिवसेनेकडून पाळला जातो की नाही? उमेदवारी कोणाला मिळते ? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सेनेसमोर आव्हान उभे करू शकते की नाही? शिवसेना आपला गड कशाप्रकारे राखते.....हे पाहणे या निवडणुकीत औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदार संघातील प्रश्न:-

वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, एमआयडीसी प्रदूषण, बुलेट ट्रेन, मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर, वाढवण बंदर, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे यांसारखे होऊ घातलेले नवीन प्रकल्प व त्यामुळे होणारे स्थानिकांचे विस्थापन, मच्छीमारांच्या समस्या, स्थानिकांना रोजगार

  • विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार:-
    शिवसेना - विद्यमान आमदार अमित घोडा, श्रीनिवास वनगा, डॉ.विश्वास वळवी, दिनेश तारवी
    काँग्रेस- मनोहर दांडेकर, सचिन शिंगडा, मनोज दांडेकर, योगेश नम
    बहुजन विकास आघाडी- मनीषा निमकर
  • 2014 विधानसभा पोटनिवडणूक:-
  • 1. अमित घोडा - शिवसेना - 67,129
  • 2. राजेंद्र गावित - काँग्रेस - 48,181
  • 3. मनिषा निमकर - ब.वि.आ - 36,781
Last Updated : Sep 19, 2019, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details