पालघर -डहाणू तालुक्यातील सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य उर्से गाव. गणेशोत्सव म्हटले की, जिथे नजर जाईल तिथे बाप्पांचे दर्शन घडते. मात्र, कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितच ठिकाणी दिसून येते. अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना पालघर जिल्ह्यातील या उर्से गावाने गेल्या 49 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.
मागील 49 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष आणि अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोस्तव, सार्वजनिक गौरी उस्तव, नवरात्रोउत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे 49 वे वर्ष असून गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास असून या गावात कुणबी आणि आदिवासी, असे दोन प्रमुख समाज राहतात. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश आजही हे गाव कायम जपून आहे. गावात कायम ऐक्य टिकून राहावे म्हणून या संपूर्ण गावात फक्त एका सार्वजनिक बापांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. संपूर्ण गावात एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. पूजेच्या मानासाठी दरवर्षी चिठ्या टाकून दोन दांपत्याची निवड केली जाते. ही प्रथा मागील 49 वर्षांपासून उर्से गावात अविरतपणे सुरू आहे. डोकोरेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जातात.