महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैतरणा खाडी रेल्वे पादचारी पुलाआभावी आणखी एकाचा बळी; एका महिन्यातील दुसरी घटना - वैतरणा खाडी रेल्वे पादचारी पूल

वैतरणा नदीच्या रेल्वे पुलावर पादचारी मार्ग नसल्याने आणखी एकाचा बळी गेला आहे. रमेश माळी असे मृताचे नाव आहे. १० दिवसांपूर्वीच याठिकाणी बेबीभाई भोईर या पादचारी महिलेचा वैतरणा नदीत बुडून मृत्यू झाला होता.

रमेश माळी या पादचाऱ्याचा मृत्यू

By

Published : Aug 17, 2019, 7:51 AM IST

Updated : Aug 17, 2019, 8:17 AM IST

पालघर- वैतरणा नदीच्या रेल्वे पुलावर (पूल क्रमांक-९२) वाढीव येथील बेबीबाई भोईर या पादचारी महिलेचा वैतरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला १० दिवसही उलटले नाहीत. तोच याच पुलावरून जाणाऱ्या रमेश माळी या पादचारीला रेल्वे गाडीने उडवले. या पुलावर नसलेल्या पादचारी मार्गामुळे हा अपघात घडला, असे येथील नागरिकांनी सांगितले. बेबीबाई या महिलेच्या मुलाचे ते सासरे होते. बेबीबाई यांचे गुरुवारी दशक्रिया विधीसाठी ते जात असताना ही घटना घडली.

वैतरणा खाडी रेल्वे पादचारी पुलाआभावी आणखी एकाचा बळी

वैतरणा खाडी येथील रहिवासी रमेश माळी हे गुरुवारी वाढीव येथे जाण्यासाठी पूल क्रमांक ९२ च्या रेल्वे रुळात लोखंडी पट्ट्या टाकून बनविलेल्या पादचारी मार्गावरून दुपारी १२ च्या सुमारास जात होते. यावेळी दोन्ही रेल्वे रुळावरून रेल्वे गाडी येत असल्याचे त्यांनी पाहिले. दुसरा पादचारी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्यांना कोणताच पर्याय नव्हता. त्यातच अचानक गाड्या आल्याने ते घाबरले व त्यांना भरधाव रेल्वे गाडीने उडविले. या अपघातात रमेश माळी यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्याची माहिती मिळताच स्टेशनमास्तर, रेल्वे पोलीस आणि सफाई कर्मचारी घटनास्थळी पोहोचून माळी यांचे मृतदेह याच रेल्वे रुळाच्या मधोमध टाकलेल्या लोखंडी पट्ट्याच्या पादचारी मार्गावरून आणले. तेथे त्यांची तोंड ओळख पटल्याने ते वैतरणा खाडी येथील रमेश माळी असल्याचे समजले.

या अपघातानंतर वाढीव व परिसरातील नागरिकांच्या वैतरणा नदी ओलांडण्यासाठीच्या पादचारी पुलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पादचारी पुलाचा मार्ग अस्तित्वात नसल्यामुळे माळी यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप येथे होत आहे. नागरिकांना पादचारी पुलाची तत्काळ व्यवस्था करावी किंवा नदीच्या दोन्ही काठावर जेट्टी बांधून प्रवासाच्या दृष्टीने बोट फेरी प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. याआधीही येथे पादचारी मार्ग किंवा पर्यायी मार्ग येथील नागरिकांना मिळावा या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या मागण्या अनेकवेळा विविध प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Aug 17, 2019, 8:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details