पालघर -भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात पालघरच्या शार्दुल ठाकुर यानेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिस्बेन कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर शार्दुल ठाकुर आज पालघरमधील माहीम येथील आपल्या घरी परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. जवळपास पाच महिन्यानंतर घरी परतलेल्या शार्दुलचे त्याच्या आई-वडिलांनी औक्षण करून स्वागत केले, तसेच केक कापून त्याच्या कामगिरीचा व भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
ब्रिस्बेन कसोटीत दमदार कामगिरी
ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने सहा फलंदाज दोनशे धावांच्या आत माघारी परतले होते. या संकटसमयी शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर स्थिरावले. सुंदरसोबत शार्दुलनेही अर्धशतक झळकावले. त्याने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. यासोबतच्या त्याने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत भारताला विजयाच्या जवळ नेले.
सर्वत्र कौतुक
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारततीय संघाने धूळ चारली. भारतीय क्रिकेट संघाने गाबा कसोटीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ने आपल्या नावावर केली. अंत्यत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात संघातील नवख्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यात पालघरच्या मराठमोळ्या शार्दुल ठाकुरनेही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कामगिरीमुळे पालघरमधील माहीम गावच्या शार्दुलचे सर्वत्र कौतुक होत आहे.