पालघर/वसई - विरारमधील ओला कॅबचालक असलेल्या संतोष झा (वय 45) याची लोणावळा येथे हत्या करून मृतदेह अमृतांजन ब्रीजजवळील दरीत फेकून देण्यात आला होता. या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला असून कर्नाटक निपाणी येथे भाड्याने घेऊन जात असलेल्या ओला कारमधील दोन प्रवाशांनी भाड्याच्या वादातून झा याची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ओला कारमधील जीपीएस प्रणालीमूळे या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ओला चालकाची भाड्याच्या वादातून लोणावळ्यात हत्या जीपीएस प्रणालीमूळे हत्येचा उलगडा
विरार येथील संतोष झा या ओला चालकाला 17 जून रोजी कांदिवली येथील युसूफ अली चाऊस (वय 32) व मुस्तकीन चाऊस (वय21) या सख्या भावांनी पनवेल येथे जाण्यासाठी ओला कार बूक केली होती. त्यानंतर प्रवाशांना घेऊन संतोष झा ओला कार घेऊन निघून गेले. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही त्यांचाशी घरच्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा राहुलकूमार याने विरार पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दाखल केली होती. विरार पोलीस ओला कारमधील जीपीएस प्रणालीद्वारे कारचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच दिवशी संध्याकाळी संतोष झा याची ओला कार कोल्हापूर जिल्हातील चंदगड ते गडहिंग्लज रोडवर सातवणी गावाच्या हद्दीत बेवारस सापडल्याची माहिती विरार पोलिसांना जीपीएस प्रणालीमूळे लागली. या ओला कारच्या जीपीएस प्रणालीवरून सदर कार भाड्याने कांदिवली येथील चाऊस भावंडांनी बुक केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केल्यानंतर संतोष झाच्या मिसींग केसचा उलगडा झाला आहे.
दोन्ही आरोपींना 13 जूलैपर्यंत पोलीस कोठडी
युसूफ अली चाऊस व मुस्तकीन चाऊस या दोघांनी पनवेल येथे जाण्यासाठी ही ओला कार भाड्याने घेतली होती. अगोदर पनवेल व मग लोणावळ्यापर्यंत ही कार या दोघांनी बुक केली. मात्र लोणावळा येथे पोहोचल्यावर आमृतांजन ब्रीज परिसरात या दोघांबरोबर ओला चालक संतोष झा याचे भाड्याच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर या दोघांनी संतोष याची प्राणघातक शस्त्राने हत्या करून दीड किमी आतील रस्त्यावरून मृतदेह दरीत फेकून दिला होता. या दोन्ही आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ अधिक तपास करीत आहेत. वसई न्यायालयाने 13 जूलैपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नक्की हत्या कशासाठी?
ओला कारचालक संतोष झा याची कार युसूफ अली चाऊस याने 17 जून रोजी पनवेल येथे जाण्यासाठी बुक केली होती. युसूफ व त्याचा भाऊ मुस्तकीन या दोघांना निपाणी येथे पनवेलवरून ट्रकने जायचे होते. मात्र त्यांना पनवेलवरून कोणतेही वाहन मिळत नसल्याने त्यांनी ओला चालकाला लोणावळ्यापर्यंत नेण्यास सांगीतले. मात्र लोणावळ्याला पोहचल्यानंतर या दोन्ही भावांकडे भाड्याचे पैसे नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवल्यावर संतोष झा याचे त्यांच्याबरोबर भांडण झाले. त्यानंतर या दोन्ही भावांनी संतोष झा याची हत्या करून मृतदेह महामार्गापासून दिड किमी आत जंगलात फेकून दिले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन पसार झाले. मात्र ओला कारमधील जीपीएस प्रणालीमूळे विरार पोलिसांना मूख्य घटनास्थळापर्यंत पोहचणे शक्य झाले असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी दिली. पोलीस आता आरोपींना घटनास्थळी नेऊन हत्या नक्की कुठे व कोणत्या शस्त्राने केली याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणेच्या रडारवर महाराष्ट्रातले नेते.. 'या' नेत्यांवर आहे करडी नजर!