पालघर - आचोळे येथे एका घरात साडेनऊ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर येथील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून ही वीजचोरी पकडली असून संबंधित वीज ग्राहक सुदाम रामचंद्र पाटील यांना चोरीच्या विजेचे देयके भरण्याची नोटीस बजावण्यात आली.
पालघरमध्ये साडेनऊ लाखांची वीजचोरी, महावितरण भरारी पथकाची कारवाई - वीजचोरी पालघर
महावितरणच्या पालघर भरारी पथकाने वसई विरार महानगरपालिका हद्दीतील आचोळे गाव परिसरातील चिमघर येथे सुदाम रामचंद्र पाटील यांच्या घरातील मीटरची तपासणी केली. वीज खांबावरून आलेले केबल वीज मीटरमधून जोडण्याऐवजी 4 कोअर केबलचा वापर करून घरात विजेचा परस्पर वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले.
महावितरणच्या पालघर भरारी पथकाने वसई विरार महानगरपालिका हद्दीतील आचोळे गाव परिसरातील चिमघर येथे सुदाम रामचंद्र पाटील यांच्या घरातील मीटरची तपासणी केली. वीज खांबावरून आलेले केबल वीज मीटरमधून जोडण्याऐवजी 4 कोअर केबलचा वापर करून घरात विजेचा परस्पर वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. टॅपिंगच्या माध्यमातून पाटील यांनी 42 हजार 812 युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. भरारी पथकाने पोलिसांची मदत घेऊन उर्वरित कारवाई पूर्ण केली. चोरीच्या विजेचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल भरण्याची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महावितरणकडून सुरू आहे. वीज कायदा-2003 च्या कलम 135 अन्वये वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय शिंदे (भापोसे) व उपकार्यकारी संचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सिंह, सहाय्यक अभियंता कुणाल पिंपळे, सहाय्यक दक्षता अधिकारी प्रशांत भोये व विशाखा राजूरकर, कर्मचारी महेश कातखेडे यांनी ही कारवाई केली.