पालघर- जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणू गटातील तेरा जागांपैकी राष्ट्रवादी चार जागांसह सर्वात अव्वल ठरली आहे. यासोबतच भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रीय काँगेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आले आहेत. तर 26 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी 9, शिवसेना 8, भाजप 7 तसेच माकपने 2 जागांवर विजय मिळवला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात एका गटाची वाढ होऊन ही संख्या 13 झाली. मागील निवडणुकीत गटात 12 पैकी भाजपचे सर्वाधिक 5 उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 2 तसेच काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला होता.
हेही वाचा :जिल्हा परिषद निवडणूक २०२०: डहाणूत राष्ट्रवादी नऊ जागांसह अव्वल
चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. मात्र महाआघाडीची खेळी राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकापुरतीच होती. त्याचा प्रत्यक्ष प्रभाव राष्ट्रवादीने दाखवून देत गटाच्या 4 आणि गणाच्या सर्वाधिक 9 जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एकप्रकारे 'बिघाडी' केल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी सांगितले.