पालघर-राज्याप्रमाणेच पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल गावड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
काँग्रेसचे जगन्नाथ गावड व शिवसेनेचे संजय पाटील यांनी पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल गावड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अनिल गावड यांनी दिली आहे. यावेळी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शाह, काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी जिल्हाध्यक्षांमध्ये सभापती पदावरून खलबते
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 17 जागा आहेत. त्यामध्ये काँग्रेस 6, राष्ट्रवादी काँग्रेस 3, शिवसेना 4+1, बहुजन विकास आघाडी 2, भाजप 3 असे बलाबल आहे. सभापती पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी झाली होती. या तिन्ही पक्षांनी 20-20 महिन्यांचा कालावधी सभापती पदासाठी वाटून घ्यावा, या अटीवर आघाडी झाली होती. तेव्हा काँग्रेसचे वासुदेव पाटील हे पहिले सभापती झाले. त्यांनी 26 महिन्यांचा कालावधी कार्यकाळ पूर्ण केला. दुसऱ्या टप्प्यात बहुजन विकास आघाडीचे नागेश पाटील यांनीही 26 महिन्यांचा कालावधी पूर्ण केला. त्यामुळे उर्वरित 8 महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.