महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मकरंद पाटील, नगरसेविका श्वेता पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी - हकालपट्टी

पालघर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मकरंद पाटील आणि नगरसेविका श्वेता पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केल्याचा आरोप. पाटील दाम्पत्य शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा.

नगरसेविका श्वेता पाटील

By

Published : Feb 28, 2019, 1:45 PM IST

पालघर - नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी नगरसेविका श्वेता मकरंद पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस अनिल गावड यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पाटील दाम्पत्य शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात करण्यात येत आहे.

सरचिटणीस अनिल गावड

पालघर नगरपरिषदेची निवडणूक येत्या 24 मार्चला होणार आहे. पालघर नागरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असून सेनेचे 17 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 10 व काँग्रेसचा 1 नगरसेवक असे बलाबल होते. नगरसेवक मकरंद पाटील यांना गटनेतेपद आणि विरोधी पक्षनेते पद पक्षाने बहाल केले होते. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न उचलून धरले नाहीत. याउलट सत्ताधाऱ्यांना मदत करणारी भूमिका बजावल्याचा ठपका जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी ठेवला. मकरंद पाटील यांनी सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका डॉ. श्वेता मकरंद पाटील यांनी नगरपरिषदेच्या सभांना जास्तीत जास्त गैरहजर कशा राहतील याची काळजी घेतली. तसेच सभांमध्ये कुठली भूमिका न घेणे, अक्रियाशील राहणे, या कारणांमुळे त्यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पाटील दाम्पत्याच्या पक्षविरोधी कारवाई केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभारी गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती गावड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details