पालघर/विरार - मुलाच्या मृत्यूचा पंचनामा व शवविच्छेदन परस्पर केल्यानंतर विरार पोलिसांनी माहिती दिल्याचा आरोप अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुबीयांनी केला आहे. विरार पूर्व बेघर हाउस परिसरात घडलेल्या या घटनेमुळे विरार पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. अंधेरी-पंपहाउस येथे राहणारा दीपेश मसूरकर (वय २६) कुटुबीयांना कोणतीही माहिती न देता दोन दिवसांपूर्वी विरार पूर्व-बेघर परिसरातील श्रीगणेश अपार्टमेंटमध्ये आला होता. मात्र, शुक्रवारी पहाटे या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याचा आवाज आला होता. तसा जबाब सोसायटीने दिला होता.
सोसायटीच्या माहितीनंतर विरार पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर वसई-विरार महापालिकेच्या विरार पश्चिम येथील शवगृहात त्याचे पोस्टमार्टमही करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी ११ वाजता विरार पोलिसांनी मसूरकर कुटुंबीयांना दीपेश मसूरकरचा अपघात झाला असल्याची माहिती दिली, असे त्याचे वडील रामदास मसूरकर यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -कोण कळकळीने अन् कोण कळीने काम करतंय हे सर्वांना माहीत आहे, महापौर पेडणेकर यांची फडणवीसांवर टीका
दरम्यान, आपल्याला कोणतीही माहिती न देताच विरार पोलिसांनी त्याच्या मृत्यूचा पंचनामा व पोस्टमार्टम कसे केले? असा प्रश्न रामदास मसूरकर यांनी केला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केलेली नसून त्याची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी रामदास मसूरकर यांनी केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत, तोपर्यंत दीपेशचा मतृदेहही ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रयत्न आहे, अशा आशयाचा अर्ज त्याच्या वडिलांनी दिला आहे. आम्ही वरिष्ठांसोबत बोलून अर्ज दाखल करून घेतला आहे. त्या संदर्भात कार्यवाही करणार आहोत. सुरुवातीला त्याच्या नाव,गाव याबाबतीत माहिती न मिळाल्याने त्याचे पोस्टमार्टम करून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुबीयांच्या ताब्यात दिला आहे. त्यांच्या अर्जानुसार साक्षीदार तपासून चौकशी केली जाईल.