पालघर/वसई - मागील काही दिवसांपूर्वी वसई विरार शहरासह राज्यात विविध ठिकाणी धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अतिधोकादायक असलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेनेही जीर्ण झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळून आल्या आहेत. त्या खाली करून जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले आहे.
वसईत अतिधोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा नालासोपारा पूर्वेतील रहमत नगर येथे तोडक कारवाई -
सोमवारी महापालिकेने नालासोपारा पूर्वेतील रहमतनगर येथे अतिधोकादायक इमारतीवर पोकलेनच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. पालिकेमार्फत या इमारतीतील रहिवाशांना आधीच इमारत खाली करण्यास सूचना दिल्या होत्या. येथील नागरिकांनी त्या सूचनेचे पालन करून इमारत खाली केली होती, त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.
अतिधोकायदाक इमारतींमध्ये पोलीस संरक्षणात इमारतीबाहेर काढून कारवाई -
नुकताच विरारमधील प्रभाग समिती क अंतर्गत येणार्या गावडवाडी व चंदनसार परिसरातील अतिधोकायदाक इमारतीमध्ये वास्तव्याला असलेल्या रहीवाशांना महापालिका अधिकार्यांनी पोलीस संरक्षणात इमारतीबाहेर काढून धोकादायक इमारतींवर निष्कासनाची कारवाई केली आहे. यात गावडवाडी परिसरातील मधु निवास, जिवन निवास, मुकुंद निवास आणि नारायण निवास या इमारतींतील रहीवाशांना बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे नारायण निवास आणि चंदनसारमधील जिवदानी इमारतीवर पालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली. दरम्यान, अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करताना रहीवाशांना इमारतीबाहेर काढले जाते. मोठ्या प्रमाणात नागरिक उघड्यावर येत असल्याने महापालिकेने त्यांच्या निवार्याची व्यवस्था केली पाहिजे. सध्या पावसापाण्याचे दिवस आहेत. अशावेळी उघड्यावर आलेल्या नागरिकांसमोर जायचे कोठे? असा प्रश्न पडला आहे. डोक्यावरील छप्पर गेल्याने पावसापाण्यात या नागरिकांना राहावे लागणार आहे. पालिकेने अशा नागरिकांसाठी निवारा केंद्राची उभारणी करून त्यांना निदान दिलासा देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.