पालघर(नालासोपारा) - शहराच्या पूर्वभागातील 'साफल्य इमारत' २ सप्टेंबरला पडली. त्यापाठोपाठ भिवंडीमध्येही मोठी इमारत दुर्घटना झाली. त्यामुळे आता शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात असे अपघात टाळता यावेत यासाठी महानगरपालिकेने अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्टेशनरोडवरील 38 वर्षांपूर्वीची अतिधोकादायक इमारतीवर कारवाईकरून ती जमीनदोस्त करण्यात आली.
नालासोपाऱ्यात अतिधोकादायक इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई - नालासोपारा धोकादायक इमारत न्यूज
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये भीषण इमारत दुर्घटना झाल्या. यामध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागला. इमारत दुर्घटनांमुळे अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यास विविध महानगरपालिकांनी सुरुवात केली आहे. वसई-विरार महापालिकेनेही नालासोपारा परिसरात कारवाई केली.
यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारवाई करताना अग्निशामक दल, महावितरणचे कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, तुळींज पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.
नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन रोडवर अजय अपार्टमेंट ही 38 वर्षांपूर्वी बांधलेली अतिधोकादायक इमारत होती. या इमारतीमध्ये 52 सदनिका आणि 20 दुकाने होती. यामधील सदनिका खालीकरून रहिवासी दुसरीकडे राहण्यास गेले होते. मात्र, दुकानदारांनी आपले बस्तान याच इमारतीत मांडलेले होते. ही सर्व दुकाने खाली करून इमारत जमीनदोस्त करण्यात आली. सर्वात अगोदर इमारतीचे नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडले व त्यानंतर एका पोकलेनच्या सहाय्याने ही इमारत पाडण्यात आली.