महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet Train Boisar Station : पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग; 100 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण - बोईसर बुलेट ट्रेन न्यूज

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी बुलेट ट्रेनच्या कामांना गती मिळाली आहे. बीकेसीवरून ही ट्रेन निघणार असून, पुढे ती बोईसरमार्गे गुजरातला जाणार आहे. सध्या बोईसरमध्ये भूसंपादनाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच बुलेट ट्रेन जाणाऱ्या जमिनींचे सपाटीकरण तसेच आखणी करण्याचे काम बोईसरमध्ये सुरु आहे.

Bullet Train Boisar Station
बुलेट ट्रेन प्रकल्प

By

Published : Jan 14, 2023, 12:23 AM IST

पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी माहिती देताना

पालघर(बोईसर) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामात पालघर जिल्ह्याने चांगलाच वेग घेतला आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास 100 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तासांत पार करण्याची क्षमता बुलेट ट्रेनमध्ये आहे. जिल्ह्यात बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण १९१.५४ हेक्टर खासगी जागेची गरज लागणार आहे. यापैकी आतापर्यंत 100 टक्के संपादन पूर्ण करण्यात आले असून, यापैकी 69.41 टक्के जमिनीचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. तर 183.99 हेक्टर बुलेट ट्रेनच्या नावे सातबारा झाला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले आहे याबाबतची रिअॅलिटी चेक ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केला आहे. त्यात बोईसर स्टेशनच्या जमिनीवर आखणीचे काम सध्या सुरू असल्याचे दिसून आले आहे.

स्पॉटची स्थिती : बीकेसीपासून सुरु झालेला बुलेट ट्रेनचा मार्ग आता महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन असलेल्या बोईसरपर्यंत पोहचला आहे. बोईसरमधून बुलेट ट्रेन जाणाऱ्या मार्गाचा रिअॅलिटी चेक करण्यासाठी ईटीव्ही भारतची टीम स्पॉटला पोहचली. यावेळी बुलेट ट्रेन मार्गावर आखणीचे काम सध्या सुरू असल्याचे दिसून आले आहे. स्टेशन होणाऱ्या ठिकाणी लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. तसेच बुलेट ट्रेन मार्गावर अनेक ठिकाणी पिलर टाकून, जमीन भरण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.

की पॉईंट : २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि अहमदाबाद या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा करून २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सुरुवातीपासूनच पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटनांचा या प्रकल्पास प्रखर विरोध होऊ लागल्याने बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास ब्रेक लागला होता. याकरिता भूसंपादनात अनेक अडथळे पार करत आता खऱ्या अर्थाने बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला असून, ज्या भागातून हा मार्ग जात आहे तेथील जागेला आता सोन्याचा भाव आला आहे. पालघर जिल्ह्यातील 71 गावामधून सदर जागा संपादीत करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील या जमीन धारकांना आतापर्यंत 734 कोटी रुपये इतका मोबदला देण्यात आला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प

जमीन संपादन : पालघर जिल्ह्यात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी खासगी हस्तांतरीत झालेल्या जमिनी व देण्यात आलेला मोबदला व बाकी मोबदला तपशीलवार खालीलप्रमाणे आहे. वसई तालुक्यात एकूण ३७.०३ हेक्टर खासगी जागेपैकी १९.८८ हेक्टर जागेचा मोबदला वाटप करण्यात आला असून १५.०९ मोबदला देणे बाकी आहे. पालघर तालुक्यात ७०.३४ हेक्टर खासगी जागा बाधित होणार असून, यापैकी ४२.९८ हेक्टर जागेचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. २५.४२ हेक्टर जागेचा मोबदला देणे बाकी आहे, याबाबतची माहिती डहाणू भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details