पालघर :गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांच्या रस्त्यांवर पाणी साचत असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध उपाय योजना केल्याचे सांगण्यात येतात, परंतु पाऊस आल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र समोर येते. वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. या घटनांमुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित प्रचंड संतापले. पूरस्थिती आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम देत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
आढावा बैठक : वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार उडाला असून शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीचा आढावा खासदार राजेंद्र गावित यांनी घेतला. वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसला आहे. महामार्गांवर अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र यावर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालिका मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, बविआचे माजी महापौर नारायण मानकर, उमेश नाईक, रुपेश जाधव,आगरी सेनेचे कैलास पाटील,जयेश पाटील, अजित खांबे,मयुरेश वाघ,राजन नाईक ,महेंद्र पाटील,मनोज पाटील यांच्यासह पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सुहास बावचे, महावितरणचे संजय खंदारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.