पालघर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीने अनेक परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत आपल्या गावी निघाले आहेत. असेच काही हजारो कामगार गावी जात असताना प्रशासनाने अडवल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अडकले होते. या कामगारांची तलासरी येथील महाविद्यालयात तात्पुरती राहण्याची व्यवस्था पालघर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गावित यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर केली आहे.
प्रशासनाकडून मजुरांची, कामगारांची निवाऱ्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था योग्यरित्या केली आहे. तसेच कोणीही घाबरून न जाता याच ठिकाणी रहावे, असे आवाहनही राजेंद्र गावीत यांनी केले आहे. यावेळी खासदारांनी येथे असलेल्या कामगारांना जेवण आणि फळ आदींचे वाटप केले.