पालघर / नालासोपारा - गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाची खासदार राजेंद्र गावित यांनी दखल घेऊन हजारो पीडितांना दिलासा देण्यासाठी पोलिसांना पाचारण केले आहे. प्रख्यात गुडविन ज्वेलर्स प्रकरणी फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांनी एकत्र येत वसई येथील विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळी, आर्थिक गुन्हे शाखेचे शिवाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक धायगुडे, भाजपचे शहराध्यक्ष उत्तम कुमार, सुधांशू चौबे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी वसई येथील विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक हेही वाचा -नोटाबंदीचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे मंदी ; ३३ टक्के लोकांचे मत
गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी पोलीस या ज्वेलर्सच्या मालकांचा शोध घेत आहेत. भाजपचे वसई शहर अध्यक्ष उत्तमकुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडविन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. सध्या गुडविनच्या दुकानाना टाळे लागले असले तरी ज्यांनी त्यांच्याकडे पैसा गुंतविला होता, त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
विश्वकर्मा हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ९०० हून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी, सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. वसई-विरार व मिरा-भाईंदर महानगरक्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी उच्च पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची हमी खासदार गावित यांनी दिली.