पालघर- जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडणाऱ्या अती पावसाचा परिणाम भात पिकावर जाणवू लागला आहे. भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाऊस असाच सुरू राहिला, तर हाताशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात बहुतांश जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनला सुरुवात होते. त्यानंतर शेतकरी भात पिकाची लागवड करतात. पीक तयार होण्यासाठी साधारणतः ८० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी देखील आता जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे भागात अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे.