पालघर/वसई - दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी त्यांनी पूर्व परीक्षा पास केली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. त्यावेळी आपल्या पतीच्या हौतात्म्यानंतर आपणही आपले जीवन देशासाठी देण्याचा निर्णय कनिका राणे यांनी घेतला होता.
ज्योती राणे, कौस्तुभ राणेंची आई कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याला 1 वर्षही पूर्ण झालेले नसताना कनिका राणे या सैन्यअधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत पास झाल्या आहेत. त्या आता ऑक्टोबर महिन्यात सैन्य प्रशिक्षणासाठी चेन्नईला जाणार आहेत. मिरा रोडच्या शीतल नगर परिसरात राहणाऱ्या मेजर कौस्तुभ राणेंना 6 ऑगस्ट 2018 ला वीरमरण आले होते.
कौस्तुभ राणे यांनी आपल्या 6 वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची शपथ घेतली होती. राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली. राणे हे आपल्या घरातील एकुलते एक असल्यामुळे संपूर्ण कुटूंबीयांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मात्र, आता त्यांच्यानंतर पूर्ण घराचा भार उचलण्याचा निर्धार त्यांची पत्नी कनिका राणे यांनी केला आहे. सैन्याच्या अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली असून त्यांनी साहसी कार्ये पूर्ण केली आहेत.
मेजर कौस्तुभ राणेंची पत्नी कनिका राणे यांनी ज्या प्रकारे कठीण परिस्थितीमध्ये सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा पास केली. यावर सासरे प्रकाश राणे, सासू ज्योती राणे यांनी मुलाप्रमाणेच सुनेचाही सर्वांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.