पालघर/विरार - अर्नाळा किल्ला परिसरात गावाला उधाणाच्या समूद्राच्या लाटांनी सलग दोन दिवस जोरदार धडका मारल्याने गावात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी दिली आहे. याबाबत तहसीलदार उज्वला भगत यांना कळविण्यात आल्याची माहिती मेहेर यांनी दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अर्नाळा किल्ला परासरातील गावाला समूद्राच्या उधाणाच्या लाटांच्या तडाखा बसून किनाऱ्यावरील घरांची पडझड होत असते. साधारण 20 एप्रिलनंतर दर महिन्याला दोन ते तीन दिवस समुद्राला दुपारच्या सुमारास मोठी भरती येत असून उधाणाच्या लाटा उसळत असतात. अर्नाळा किल्ल्यात साडेचार हजार लोकांचे गाव असून 28 एप्रिल व 29 एप्रिलला उत्तर पूर्व येथे आलेल्या उधाणाच्या समुद्राच्या लाटांनी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या लाटांच्या तडाख्यात किनाऱ्यावरील वासंती म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, सचिन मेहेर, राकेश म्हात्रे या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी तहसीलदार उज्वला भगत यांना सदर घटनेबाबत कळवून नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.