पालघर- ओलाच्या माध्यमातून गाडी भाड्याने घेऊन चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व कार हस्तगत करण्यात आली आहे.
पालघरमध्ये गाडी भाड्याने मागवून चालकाला लुटणारे २ दरोडेखोर जेरबंद - OLA CABS IN PALGHAR
गाडी भाड्याने घेऊन चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून त्यांच्याकडून आठलक्ष किंमतीची मारुती सुझुकी एर्टीगा गाडी व एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
सचिन जयराम हांगे (वय २८) यांना ओला अॅपद्वारे वसई ते वापी येथे जाण्यासाठी बुकिंग मिळाली. हांगे हे आपली एर्टिगा कार घेऊन रात्री साडेअकराच्या सुमारास वसईच्या अंबाडी नाक्यावरून चार अज्ञातांना घेऊन वापी, गुजरात येथे जाण्यासाठी निघाले. वापीजवळ पोहचले असता चार जाणांपैकी एकाने 'हमारी युपी जानेवाली ट्रेन छुट गई है, हमे सुरत मे छोड दो' असे सांगितल्याने हांगे त्यांना सोडण्यासाठी सुरतकडे निघाले. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सुरतजवळ आल्यावर त्या चार प्रवाशांनी लघुशंकेसाठी गाडी रस्त्याच्या बाजुला थांबविण्यास सांगितली. बंदुकीचा धाक दाखवत चालकाचा मोबाईल व दहा हजार रुपये घेत ते हांगे यांची गाडी घेऊन फरार झाले होते.
माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने जोगेश्वरी येथील पुखराज चेनाराम जानी (वय १९) व वसईत राहणारा राकेशकुमार चंद्रभान बिश्नोई (वय १९) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आठलक्ष किंमतीची मारुती सुझुकी एर्टीगा गाडी राकेश कुमारच्या वसई येथील घराबाहेरून हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.