पालघर - बोईसर- तारापूर एमआयडीसी येथील तुंगा या खासगी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापकाला रुग्णाच्या भाजपा पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. बिलाच्या रकमेवरून झालेल्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण रुग्णालयाच्या बिलावरून झाला वाद-
तुंगा रुग्णालयात उपचार घेतलेल्या एका रुग्णाच्या बिलावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी हा बिलाची रक्कम कमी करण्यासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रशांत संखे यांना रुग्णालयात बोलावून घेतले. त्यावेळी बिलाची रक्कम कमी करण्यासाठी मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट रुग्णालयातील संगणक व इतर साहित्याची मोडतोड केली. तसेच तसेच रुग्णालयाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात मारली असल्याची तक्रार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण भाजपाचा पदाधिकारी ताब्यात-
सध्या या रुग्णालयात 35 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, मारहाणीच्या या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्याच्यावर कारवाई न झाल्यास कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर पोलिसांनी भाजपाचे स्थानिक नेते प्रशांत संखे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.